
कोल्हापूर (शेख शौकत मुजावर) : ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार, अर्थात ‘मैत्री दिन’ जगभरात मित्रत्वाचे बंध साजरे करण्यासाठी ओळखला जातो.परंतु या पारंपरिक संकल्पनेला एक नवी, विधायक आणि दूरगामी विचारांची
जोड देत क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौक येथील प्रफुल्लित केंद्राने एक आगळावेगळा मैत्री दिन साजरा केला.
निरोगी आरोग्यासाठी योग,आनंदी मनासाठी ध्यान आणि विचारांसाठी पुस्तके यांच्याशी मैत्री करण्याचा संकल्प करा
असे प्रतिपादन योगा प्रशिक्षका तथा केंद्राच्या अध्यक्षा डॉ.आल्फिया बागवान यांनी करत महिलांनसाठी योग सत्राचे आयोजन केले.
महिलांसाठी निरोगी आरोग्यासाठी योग’या संकल्पनेवर आधारित या सत्रात विविध आसने आणि प्राणायाम घेण्यात आले.उपस्थित महिलांनी काही काळ शांत बसून ध्यानाचा अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांना मानसिक हलकेपणा आणि प्रसन्नतेची अनुभुती आली. कार्यक्रमात केवळ बौद्धिक आणि आरोग्यविषयक सत्रांवरच भर दिला गेला नाही,तर महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचेही आयोजन करण्यात आले होते,खेळांमधून महिलांनी एकमेकींशी संवाद साधत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.
या कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा आणि अभिनव भाग होता
'पुस्तकांशी मैत्री' करण्याचा संकल्प. या संकल्पनेअंतर्गत,केंद्रात एका मोफत ग्रंथालयाची घोषणा करण्यात आली.मैत्री दिनाचे औचित्य साधून ते सर्वांसाठी खुले करण्यात आले.या ग्रंथालयामुळे परिसरातील महिला आणि मुलांना विविध प्रकारची पुस्तके सहज उपलब्ध होणार आहेत.
आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात,जिथे नात्यांची परिभाषा बदलत आहे, तिथे प्रफुल्लित केंद्राने मैत्रीची एक व्यापक संकल्पना समाजा समोर ठेवली.केंद्राचे संस्थापक,डॉ.प्रफुल्ल पाटील यांनी या कार्यक्रमामागे असलेली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले, "मित्र केवळ व्यक्तीच नसतात,तर आपले आरोग्य,आपले विचार आणि आपली विवेकबुद्धी हे देखील आपले सर्वात मोठे मित्र आहेत.पुस्तके हे असे मित्र आहेत जे आपल्याला कधीही एकटे सोडून जात नाहीत उलट ते आपल्याला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या एका नव्या जगात घेऊन जातात. आजच्या काळात, जिथे मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे मानसिक एकाग्रता कमी होत आहे, तिथे पुस्तकांशी मैत्री करणे हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही,तर ते वैचारिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.

या आगळ्यावेगळ्या मैत्री दिनाच्या कार्यक्रमाला रेश्मा कातकर, बिस्मिल्ला नदाफ,श्रावणी पडलकर, क्षितिजा पाटील, श्वेता गुरव यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रफुल्लित केंद्राने आयोजित केलेला हा कार्यक्रम केवळ एक दिवसाचा उत्सव न राहता, तो एक सातत्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणारा ठरला. स्वतःच्या आरोग्याशी, मनाच्या शांतीशी आणि ज्ञानाच्या अथांग स्रोताशी,म्हणजेच पुस्तकांशी मैत्री करणे,हीच खऱ्या अर्थाने स्वतःच्या जीवनाला दिलेली सर्वात मोठी भेट आहे,हा मोलाचा संदेश या कार्यक्रमातून सर्वदूर पोहचत असून या संकल्पने प्रफुल्लित केंद्राचे महिला वर्गाकडून कौतुक केले जात आहे.
No comments:
Post a Comment